Monday, 12 March 2018

एक थेंब अश्रूंचा

एक थेंब अश्रूंचा
खूप काही सांगून गेला
जणू दू:खातल्या भावनांचा
पाढाच वाचून गेला

गालावरती जाता जाता
ओघळ सोडून गेला
जणू आठवणींच्या वाळवंटात
ठसेच उमटवून गेला

तो एकच थेंब असा
मनाची दुर्दशा सांगून गेला
जाता जाता तो
मन कठोर बनवून गेला
मन कठोर बनवून गेला

                 -  वरद




Friday, 9 February 2018

नजर...!!!

नजरेत तुझ्या त्या भावनांचे
गीत हे असे ओसंडले
अबोल माझ्या ह्या शब्दांचे
सूर नयनी जसे जडले

सुंदर एका कटाक्षाने
हृदय चिंब झाले
चक्षुंच्या ह्या संवादाने
शब्दांचे हे गीत बनले

नाते असे हे नयनांचे
अव्यक्त अशा त्या शब्दांचे
नजरेच्या त्या लेखणीने
भाव विश्व चितारण्याचे

              - वरद

Tuesday, 6 February 2018

व्यथा...!!!

पाहता पाहता तुला
तिन्हीसांज झाली
तुझीच किरणे डोळ्यात अन्
माझी पहाट झाली

हृदयातल्या भावना
फक्त डोळ्यातच ठप्प
पापण्यांचे झाले शब्द अन्
ओठ मुग गिळून गप्प

अनवधानाची ती भेट
बोलावे कसे कळेना
विरेल तुझे हसणे उगा
भीती माझी टळेना

             -  वरद

Friday, 12 January 2018

वादळ...!!!

तो प्रकाश म्हणे मजला
थांबू मी कशाला
गेला हरवूनी ह्या नभात
भोत हा कुणी गगनात सोडला

अंधारल्या रात्री साऱ्या
काळोख चराचरात भरलेला
हरवला तो स्वर्ग आज
मी माझ्यात जपलेला

बेफाम वादळ हे मनी
हृदयात किती हा धुरळा
शत नभी सजलेला तो
चंद्र आज कुठे कोसळला

सुखाच्या या सांजवेळी
भान सारे हरपलेले
क्षणाक्षणात भरलेला
मग हा अाक्रोश असे कुठला

                  - वरद